मुंबई प्रतिनिधी :
दि. २० जानेवारी २०२६
राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता थेट महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंत अर्ज प्रक्रियेसाठी कृषी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता ऑनलाईन प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि पूर्णतः शेतकरीकेंद्रित होणार आहे.
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने विलंब आणि अडथळे टळणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार असून शासन–शेतकरी यांच्यातील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या सुरक्षेला आणि सन्मानाला प्राधान्य देणारे हे पाऊल असून, बळीराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश यातून दिला आहे.



