राजगडावर रोप वे करण्यासंदर्भात नियोजन सुरु आहे. मात्र, त्या रोप वेस काही जण विरोध करतायेत तर काही जण समर्थन करतायेत. भगवान चिले यांनी विरोध का यासंदर्भात फेसबुक पोस्ट लिहली आहे. ती पोस्ट पुढे आपल्या सर्वांना वाचनासाठी जशी आहे तशी येथे शेअर करीत आहोत.
राजगड रोप वेला आमचा डोळस विरोध, का व कशासाठी ?
( प्रथम पोस्ट व्यवस्थित वाचा, विषय समजून घ्या मग वाटले तर सूज्ञपणे व्यक्त व्हा.)
गेली चार दिवस आपल्या सर्व डोंगर भटक्या, किल्लेप्रेमींमध्ये राजगड रोपवे संदर्भातच चर्चा, विचारमंथन चालू आहे. ही चर्चा अधिक व्यापक नेमक्या विषयावर व्हावी म्हणून मी ही राजगड रोपवे विरोधाची दुसरी पोस्ट इथे टाकत आहे. राजगड रोपवेसाठी सर्वात प्रथम विचार करायला हवा तो गडाच्या माथ्यावरील जागेच्या क्षेत्रफळाचा. राजगड किल्ल्याचा आकार हा आपल्या घरातील सिलिंग फॅन सारखा आहे. सिलिंग फॅनला तीन पाती असतात, त्याप्रमाणेच राजगडला पद्मावती, सुवेळा व संजीवनी अशा तीन माच्या आहेत व मध्यभागी आहे राजगडाचा ‘या सम हा’ असणारा बालेकिल्ला.
यातील पद्मावती माचीचे क्षेत्रफळ आहे 12.2 एकर, संजीवनी माचीचे क्षेत्रफळ आहे 14.4 एकर, सुवेळा माचीचे क्षेत्रफळ आहे 28.8 एकर तर बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ आहे 5.21 एकर तर राजगडाचे एकूण क्षेत्रफळ आहे 82 एकर. या 82 एकर मधील वास्तू चौथरे, इमारती, मंदिरे, पाण्याची टाकी व तलाव यांनी व्यापलेली जागा सोडली तर राजगडावर सपाट ऊभारता येईल अशी पन्नास टक्के म्हणजे 40 एकरच सपाटीची जागा ऊरते. मग आता विचार करा राजगडावर रोपवेने आपण लोकांना आणले तर या 40 एकराच्या जागेत माणसे नक्की किती मावणार. याऊलट ज्या रोपवेचा आदर्श डोळ्यासमोर धरून आपण चालत आहोत त्या रायगडाच्या माथ्यावर 447 एकर एवढी जागा आहे.
राजगडाच्या माथ्यावरील पद्मावती माचीवर आपण रोपवेने ज्येष्ठ नागरिकांना आणून सोडले तर पद्मावती माचीवरून सुवेळा माचीच्या टोकावर जाण्यासाठी साधारण दोन कि मी, पद्मावती ते संजीवनी माची साधारण सव्वा दोन कि मी चालावे लागेल. त्यातच या दोन्ही माच्यांवर जाणारी पायवाट दरीच्या माथ्यावरून व ती साधारणपणे एक ते दीड फूट रूंदीची आहे. त्यातच या सर्व मार्गावर सुवेळा माचीचा थोडा अपवाद वगळता झाडी कोठेही नाही म्हणजे सावलीच नाही. याशिवाय बालेकिल्ला पाहायचा झाला तर पद्मावती माची ते बालेकिल्ला ही अत्यंत चिंचोळ्या वाटेची 400 फूटाची वेगळी चढाई करावी लागते. ( सर्व साधारण पणे एक मजला 12 फुटाचा धरला तर ही चढाई 35 मजल्याची होते) आता ही 35 मजल्याची चढाई आपल्याला विदाऊट लिफ्टची पायीच तीही खोबणीत हात घालून शरीर तोलून करावी लागणार. मग एकंदरीत आपण विचार केला की ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व अपंग यापैकी कोणालाही आपण रोपवेने राजगडावरील पद्मावती माचीवर नेले तरी त्यांना वर सांगितलेला एवढा प्रवास पायीच करावा लागणार. ( पण सध्या राजगडाला रोपवे नसूनही शेकडो लहान मुलांच्या सहली, ज्येष्ठ नागरीक, अनेक अपंग व्यक्ती स्वबळावर वा मित्रांच्या सहाय्याने राजगडावर शिवप्रेमापोटी चढून येतात व वर ऊल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी फिरतातही.)
रोपवेने लोकांना राजगडाच्या पद्मावती माचीवर आणले तर दुसरा प्रमुख मुद्दा पिण्याच्या पाण्याचा. राजगडावर अनेक तलाव, टाकी आहेत पण त्यातील पद्मावती माचीवरील दोन देवीची टाकी, गुंजवणे दरवाज्यावरील पाण्याचे टाके, सुवेळा माचीवरील दोन खांब टाकी, काळेश्वरी बुरूजावरील पाणी टाके व संजीवधी माचीवरील एक टाके एवढ्याच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य ऊरलयं. बाकी सर्व टाकी तलावातील पाणी ऊपश्याअभावी खराब झाले आहे. रोपवेने हजारो लोक राजगडावर येणार तर त्यांना वरील पाणी कसे पुरणार, मग टॉयलेट सारख्या इतर गोष्टींना ( अपवाद पद्मावती माचीवरील पद्मावती तलावाचा) पाणी कसे पुरणार.
याशिवाय रोपवे साठी गड माथ्यावरील सपाटीची जागा, ऊपगृहासारख्या गोष्टींना लागणारी जागा, स्वच्छतागृहाची जागा, वेटींग रूम, रोपवेच्या कर्मचार्यांसाठी जागा या अशा अनेक महत्वपूर्ण बाबी निरूत्तरीतच आहेत. याशिवाय राजगडावरील मधमाश्यांच्या शेकडो पोळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, येथील बिबळ्या वाघासह अनेक जंगली प्राण्यांचा वावराचा प्रश्न, अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी, दुर्मिळ वनस्पती ( विस्तार भयास्तव ती यादी मी येथे देत नाही) यांच्या सुरक्षेचे काय? या प्रश्नाचेही ऊत्तर आपणास कितीही विचार केला तरी पटत नाही. गेले चार दिवस राजगड शिवाय दुसरा विषय डोक्यात नाही, राजगडाची काळजी वाटतेयं. तुम्हीही विचार करा, वरील बाबींचा विचार करून राजगड रोपवेला सनदशीर मार्गाने विरोध करा, व्यक्त व्हा.
( वरील पोस्ट मधील तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी माझे दुर्गमित्र सुदर्शन कुलथे व निनाद बारटक्के यांनी मला मोलाची मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद)
आपला नम्र — भगवान चिले
बातमी नक्की शेअर करा