पिंपरी चिंचवड प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २१ ऑगस्ट २०२१
येत्या चार सहा महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा धुरळा उडणार आहे. विशेष करुन, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक महानगरपालिकांच्या निवडणूकांकडे सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही महाराष्ट्रातील महत्वाची शहरे तर आहेत, परंतू, त्याठिकाणचे नेतृच्व करणारी मंडळी ही राज्यातील दिग्गज नेते आहेत. त्यामूळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचे फलित म्हणून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झाले आहे.
भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी मध्ये पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश पुणे येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेले माजी नगरसेवक राजू लोखंडे यांच्या पत्नी चंदा लोखंडे या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. सन २०१७ साली झालेल्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये या प्रभागातून भारतीय जनता पार्टीचे ४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केल्याने पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी व आमदार लक्ष्मण जगताप यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. तसेच, येत्या काही दिवसांत शहरातील अनेक नगरसेवक व मातब्बर नेते राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधणार आहेत, अशी जोरदार चर्चा शहरात सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील एक महत्वाचा व महाराष्ट्राच्या सत्तेतील पक्ष आहे. त्यातच, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात कारभारी म्हणून मागील काळात काम पाहिले आहे. मात्र, सन २०१७ साली भारतीय जनता पार्टीच्या लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता उलथवून टाकण्यात भाजप नेत्यांना यश आले होते. मात्र, यावेळेस राज्यात सत्तेवर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणा-या निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत.
पुणे शहरात ही माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, मनसेच्या विशाखा गायकवाड व ऊरुळी देवाची गावचे माजी उपसरपंच प्रशांत भाडळे पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला आहे. त्यामूळे राष्ट्रवादीतील इनकमिंग निवडणूकांच्या तोंडावर वाढले असल्याचे दिसत आहे. तेंव्हा, येणारा काळच प्रभावी पक्ष कोणता सांगेल. मात्र, सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात चलती असल्याचे दिसत आहे.