पुणे प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगमनालाच गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रीय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे चित्र कायम राहणार की त्यावरही पावसाचे पाणी फिरणार याबाबत उत्सुकता आहेच. दरम्यान, आज मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने तडाखेबंद सुरुवात केली. पावसाचा एकूण रागरंग पाहता मुसळधार पावसाची ही कामगिरी पुढेही कायम राहू शकते असे दिसते. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
हमावान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टी असलेल्या प्रदेशात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पावसाची कामगिरी दमदार पाहायला मिळू शकते. सध्या ढगाळ वातावरण असलेल्या कोकण किनारपट्टीलगत मुसळधार पवासाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यातही वातावरण ढगाळ आहे. तर, घाटमाथ्यावर दमदार पाऊस आहे.
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई