पुणे प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
राज्यात सध्या विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत असे समजते. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळंच ट्विट करून खळबळ माजवली आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारून भाजपसोबत जाण्याबद्दल आपली अनुकूलता दर्शवली आहे. उद्धव ठाकरेंनी तर थेट, “एकनाथ शिंदेंनी सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही, तर मी आत्ता राजीनामा देतो” असं म्हटलं आहे. या वादात आता आंबेडकरांनी ट्वीट करत चर्चांना उधाण आणणारा सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंसमोर भाजपने मोठी अट घातली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एक वेगळाच प्रश्नार्थक सूर लावला आहे. त्यांनी विचारले आहे की भाजपने एकनाथ शिंदेंसमोर पक्षात विलीन होण्याची अट घातली आहे का? त्यांच्या या वेगळाच सवाल उपस्थित करणार्या ट्वीटने अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत.
यातच भर म्हणून आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल गुवाहाटी येथे पोहोचत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला ४० आमदारांचा आकडा खरा होता असं दिसायला लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतल्याचं स्पष्ट झालं असून त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक सध्या शिंदेंसोबत आहेत. सुनील प्रभूंचं काय ते बघू असंही ते म्हणाल्याचं समजतंय.