मुंबई प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले मा. नितिन नांदगावकरांनी आज शिवसेनेतील बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर श्री. एकनाथ शिंदे व इतर आमदारांबाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हा इशारा दिला. “आधी मी समाजकंटकांना फोडून काढत असे, आता बंडखोरांना फोडणार आहे” असं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जवळ जवळ 40 आमदारांसह एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आहेत असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं आहे. यानंतर काल रात्री मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावरून ‘मातोश्री’ कडे निघाले तेव्हा शिवसैनिकांची एकच गर्दी लोटली होती. सगळे वातावरण भावुक झाले होते आणि बंडखोरीमुळे संतापही सर्वांच्या चेहर्यावर दिसून येत होता.
शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांनी शिवसैनिकांना सेनाभावनावर जमण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक सेनाभावनावर जमले होते. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद अश्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता.
याच पार्श्वभूमीवर, “गद्दारांना सोडणार नाही. याआधीही मी त्यांना फोडून काढण्याचं काम करत होतो, यापुढेही ते करत राहीन आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे” असं नितिन नांदगावकर म्हणाले. त्यांच्या या इशार्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.