मुंबई प्रतिनिधी :
दि. 25 जून 2022
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की राज्यात सुरू असलेल्या राजकीय घटना अथवा बंडखोर मंत्री एकनाथ शिंदें या दोन्ही गोष्टींशी त्यांचा सुतराम संबंध नाही. पुढे त्यांनी असेही संगितले की बंडखोर आमदारांकडून सरकार बनवण्याविषयी कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला नाही. श्री. पाटील पुढे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार उलथण्याचा त्यांचा कसलाही डाव नाही.
मा. चंद्रकांत पाटील शुक्रवारी कोल्हापूर येथे बोलत होते त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. कुणीही सत्तेत येण्यासाठी प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्षांनी मा. शरद पवार यांनी केलेल्या आरोपांविषयी उत्तर देताना म्हटले, “ते त्यांच्या विचारांप्रमाणे बोलत आहेत. आमचा सरकार पाडण्याचा कुठलाही प्लॅन नाही व आम्ही तसा प्रयत्नही करत नाही!” पण पुढे त्यांनी असंही सांगितलं की मी वेळोवेळी म्हटलं होतं की अंतर्गत कलहामुळे सरकार पडेल, जसं की आता दिसतंय.
एकनाथ शिंदेंचा भाजपकडे इशारा?
दरम्यान गुवाहाटी येथील एका हॉटेलमधून शिंदे यांनी 42 आमदारांसामवेत एक व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचे बोलले जात आहे, ज्यात ते म्हणतात की एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. ते पुढे असेही म्हणतात की त्या पक्षाने आम्हाला आमचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे संगितले आहे आणि कुठलीही मदत लागल्यास ते आम्हाला देण्यास तयार आहेत.
यामुळे भाजपाच्या आपला कुठलाही संबंध नसल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे.
ताज्या बातमीनुसार शिवसेनेचे 38 वे आमदार गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलवर पोहोचले आहेत ज्यामुळे बंडखोर आमदारांची संख्या 37 च्या वर झाली आहे जिची पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांना आवश्यकता होती. त्यामुळे एकूण संख्येच्या दोन तृतीयांश असलेल्या या आमदारांची आता पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाल्याचे बोलले जात आहे.