पुणे प्रतिनिधी :
दि. 28 जून 2022
महाराष्ट्रातील राजकीय घटनांना प्रचंड वेग आला आहे. कधीही काहीही उलथापालथ होऊ शकेल अशी परीस्थिती आहे. एकनाथ शिंदेंच्या बरोबर असलेले बंडखोर आमदार अजूनही गुवाहाटीतच आहेत आणि तिथून सगळी सूत्रे हालत आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण जाऊन पोहोचलेले आहे. 12 जुलै पर्यन्त कोर्टाने अपात्रतेच्या बाबतीत कोणत्याही करवाईला मज्जाव केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या बाबतीत चर्चांना आणि अंदाजांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकार जाण्याची शक्यता वर्तवणारी सूत्रांची माहिती असताना दुसरीकडे भाजपा काय खेळी खेळते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यालाच जोडून मंत्रिपद कुणा कुणाला मिळणार याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. पुण्यातून कोण मंत्री होणार हे कुतूहल सर्वांना आहे. या स्पर्धेत तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील, आमदार माधुरीताई मिसाळ आणि आमदार भीमराव आण्णा तापकीर यांच्यापैकी मंत्रिपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच दलित चेहरा म्हणून सुनिल कांबळे यांनाही मंत्रीपदाची संधी मिळू शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे.
आत्तापर्यंतची त्यांनी केलेली कामे, जनमानसातील त्यांची प्रतिमा आणि पक्षावरील त्यांची निष्ठा याबाबत हे सर्व तुल्यबळ आहेत असे दिसते. यांच्यापैकी कोणीही मंत्री झाले तरी पुण्याची शान वाढेल हे नक्की. आता पक्षश्रेष्ठींचा सूर काय यावर सगळे अवलंबून आहे.