मुंबई प्रतिनिधी :
दि. 1 जुलै 2022
काही दिवसांपूर्वी ‘ईडी’ ने बजावलेल्या समंसला अलिबागला जाण्याचे कारण देऊन बगल दिलेले संजय राऊत अखेर आज ईडी समोर हजर झाले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ईडी ऑफिससमोर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. पत्रा चाळ प्रकरणात राऊत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या वर्षी एप्रिल महिन्यात ईडी ने संजय राऊत यांच्या 11.15 कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता सील केल्या होत्या. यात दादरमधील एका फ्लॅटचाही समावेश आहे जो संजय राऊत यांच्या पत्नी श्रीमती वर्षा राऊत यांच्या नावावर आहे. याशिवाय अलिबागजवळील किहीम गावातील 8 भूखंडही ईडी ने ताब्यात घेतले होते जे वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या संयुक्त मालकीचे होते.
“मी ईडी समोर 12 वाजता हजर होतो आहे. मी ईडी ने पाठवलेल्या समन्सचा आदर करतो आणि त्यांच्यासमोर हजर होणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी ऑफिस बाहेर गर्दी न करण्याचे आवाहन करतो. काळजी करू नका!” असे ट्विट संजय राऊत यांनी ईडी समोर हजर होण्याआधी केल्याचे समजते. हे ट्विट त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख मा. शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना टॅग केले आहे.
पण यानंतर आता संजय राऊत हेही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या वाटेने जात असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे.