मुंबई प्रतिनिधी :
दि. 02 जुलै 2022
मा. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार संपुष्टात आलं. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या सरकार स्थापनेविषयी. सरकार कोण बनवणार, कसं बनवणार हे जवळ जवळ सर्वांनाच माहीत होतं असं दिसत होतं. बंडखोर आमदारांच्या मदतीनं भाजपा सरकार बनवणार आणि सगळं ठरल्याप्रमाणे होणार असं दिसत होतं.
याच पार्श्वभूमीवर मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार ही अगदी काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. ते मुख्यमंत्री आणि मा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे पक्कं ठरल्याचं दिसत होतं. आणि…चक्रं फिरली. सगळ्यांनी भला मोठा ‘आ’ वासला? काय? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री? असं कसं? हा एकदम झटकाच आहे इ. प्रतिक्रियांचा धो धो पाऊस सुरू झाला.
या सिनेमात बरीच पात्र, कथानकं, उपकथानकं, व्हिलन असा सगळा मसाला होता पण डायरेक्टरकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. डायरेक्टरनं कथानकात असा काही ट्विस्ट आणला की सिनेमा जणू हजार कोटीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या यादीत एकाच दिवसात सामील झाला.
डायरेक्टर बसले होते दिल्लीत! त्यांचं नाव मा. नरेंद्र दामोदरदास मोदी! भारताचे पंतप्रधान!
सूत्रांकडून असं समजतं की मोदींच्या ‘परिवारवाद अंत अभियानाचा’ एक भाग म्हणून हा सगळा गेम झालाय. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव, देशातून गांधी घराणं आणि आता शिवसेनेतून ‘ठाकरे’ परिवाराचं वर्चस्व संपुष्टात आणण्याचा हा सगळा मामला आहे. बंडखोर मंत्री आजही म्हणत आहेत की आम्ही शिवसेनेचेच आहोत आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम भक्त आहोत.
म्हणजे आता चित्र असं आहे की सत्ता शिवसेनेकडे आहे पण त्यात मा. उद्धवजी नाहीत. हाच गेम भाजपानं केलाय. त्यात परत मा. एकनाथ शिंदे यांना म्हणजे एका ‘मराठा’ माणसाला मुख्यमंत्री करून आघाडी सरकारचा ‘मराठा’ राजकारण करून सत्ता सुखेनैव चालवण्याचा डावही पंतप्रधान मोदींनी हाणून पाडलाय. आम्ही जातीचं राजकारण करत नाही हे दर्शवण्यासाठी मा. एकनाथ शिंदे यांच्या रुपानं एक ‘मराठा’ सरळ मुख्यमंत्री बनवून डायरेक्टर मा. पंतप्रधान मोदींनी मा. शरद पवार साहेब, मा. उद्धवजी ठाकरे आणि श्रीमती सोनिया गांधी यांना एकाच वेळी मात दिल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.