मुंबई प्रतिनिधी :
दि. 11 जुलै 2022
आज सुप्रीम कोर्टात मुख्यतः दोन याचिकांवर सुनावणी व्हायची होती. एक होती उद्धव ठाकरे गटाने केलेली 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची तर दुसरी होती राज्यपालांच्या विरोधात. ही याचिका थेट एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे असं म्हणणारी होती. राज्यपालांनी एकनाथ शिंदे गटाला सरकार बनवण्यासाठी जे पाचारण केलं होतं ते घटनेला धरून नाही असं उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं. शिवाय आपल्या व्हिपला न जुमानता, त्याच्या आदेशाचं उल्लंघन करून स्पीकरची निवड झाली असंही या गटाचं म्हणणं होतं.
सुनावणी सुरू झाली तेव्हा ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करणार हे स्पष्ट होतं.
सूत्र सांगतात की कामकाज सुरू झालं आणि न्यायमूर्ती व्ही. के. रामण्णा यांनी आपलं मत नोंदवलं. ते म्हणाले की 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा जो मुद्दा आहे तो एका दिवसात चर्चा करून निकाल देण्यासारखा नाही. आमदार निवडून जेव्हा येतात तेव्हा ती प्रक्रिया मोठी असते. जनतेनं त्यांना निवडून दिलेलं असतं. आले आणि आमदार झाले असं झालेलं नसतं. त्यामुळे त्यांना पात्र किंवा अपात्र ठरविण्याची प्रक्रियाही एका दिवसात होऊ शकत नाही. त्यासाठी एका ‘बेंच’ची स्थापना केली जाईल आणि त्याच्या अहवालनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि स्पीकर याबाबतच्या याचिकेवरही सुप्रीम कोर्ट म्हणालं की सद्यःस्थितीत काहीही बदल न करता कामकाज सुरू ठेवावे.
या सर्व घडामोडींमधून शिंदे गटाला फार मोठा विजय मिळाल्यासारखं वाटतं आहे आणि सध्यातरी कारभार विनाअडथळा सुरू ठेवता येणार आहे. कपिल सिब्बल यांना त्वरित निर्णयाची घाई झाली होती असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं.